Friday, April 5, 2013

ग्रेस ..

तू देउन गेला जाता
दु:खाचा निळासा भार
स्वप्नांच्या वाटेवर
दाटला गडद अंधार

हे जगणे अडले येथे
तू जेथे सोडली साथ
चाचपडत शोधतो आहे
सुखाचा मोडका हात !

-अनिल बिहाणी.

...

मी डॊहात शोधत होतो ,सुखाचे गहीरे पाणी !
हा डॊह पहुडला होता , दु:खाच्या शुष्क किनारी !!

-अनिल

Sunday, March 24, 2013

तुझ्यासाठी....

शब्दांतूनी मी मझ्या
गावी तुझीच गाणी
स्फुरू नये मुळीच
मजला कधी विराणी

ओठांवरी रूळावे
फ़क्त तुझेच नाव
चालावी पाउले वाट

जेथे तुझेच गाव .

-अनिल बिहाणी.

Monday, March 18, 2013

रात्रीचा बंदोबस्त करावा म्हणतो...

हल्ली मी संध्याकाळी झोपतो
कंटाळा येते हो रोज
तीच जुनी आठवणींची पुस्तकं चाळायला
बरं चाळली असती रोज हवं तर पण;
नंतर तासनतास शुन्यात नजर लावून बसणं
सोसत नाही हो हल्ली ...!
तेही केलं असतं पण कधीकधी
येणा-या पूरात वाहून जातं घर
आणि टवके उडतात ,रंग उडतो
पुन्हा जखमा उघड्या पडतात ..
मग संध्याकाळची सुद्धा गरज पडत नाही
कैफ़ उरतो दिवसभर...
म्हणून हल्ली मी संध्याकाळी झोपतो...
.
.
.
.
आता रात्रीचा बंदोबस्त करावा म्हणतो...
-अनिल बिहाणी

Friday, February 15, 2013

ऐक माझं ....

मान्य ठरवूनही सोडता येत नाही हात ;
हटकून बदलता येत नाही वाट ..

पण ;
सुटलाय हाताला घाम
थांब जरा; सोड हात
घेउ दे श्वास मोकळा
हवं तर धरु अबोला

चालताना पायच्या भेगांमधुन
झिरपत चाललंय आयुष्य
ठिबकतंय दु:ख अखंड
गंजलेल्या नळासारखं

रोज रोज तीच पडझड
पुन्हा पुन्हा डागडुजी
तेच तेच ओरबडणं
पुन्हा उगाच मलमपट्टी

ऐक माझं इथंच थांबू
ठरवून सोडू हात
तुझं माहीत नाही
मी मात्र बदलतोय वाट , हटकून !

-अनिल बिहाणी

Saturday, February 2, 2013

वादळ...!



गाडलेल्या मनाच्या तळघरात
आजही घोंघावतात
निद्रिस्त स्वप्नांची
वेडी वादळं.

उसळतात , रोरावतात
उद्ध्वस्त करीत सारं
होतात शांत
... आपसूकच कधीतरी

पण तरीसुद्धा ,

मनाच्या थडग्यावरील
अस्तित्वाची माती
मी कणभर देखील हलू देत नाही
निर्ढावलेपणाने ! नि:संशय !

-अनिल बिहाणी

पाउस...

.

आज आभाळ भरून आलं
पण..पाउस आलाच नाही .

नेत्रं उजाळली
मनं शहारली
पदरं कुजबुजली
पण...पाउस आलाच नाही .

... आस सडली
स्वप्नं ओघळली
धरती हळहळली
पण..पाउस आलाच नाही

मुंडकी टांगली
वस्ती पांगली
अश्वासनं विखुरली
पण...पाउस आलाच नाही !

-अनिल म. बिहाणी