Sunday, March 27, 2011

स्त्रीत्व......


स्वयंपाक घरातून येणारी
बांगडयांची किण किण
हलुहलू मंद होत जाते
काजळी साचलेल्या ज्योतीसवे....
.
.
.
.
.
आता
बांगडयांची किण किण
आतल्या खोलीतून ....

-अनिल म बिहाणी .

पुस्तकाप्रमाणे.....


शब्दा शब्दातुन
उलगडत गेले आयुष्य
पुस्तकाप्रमाणे

जो तो येता जाता
चाळतच राहिला
पुस्तकाप्रमाणे

आता शेवटची काही पाने
वार्यावर फडफडणारी
पुस्तकाप्रमाणे .

- अनिल म बिहाणी .

कारण...


उगवत्या भास्कराला वंदन करणारे हात
जुंपले जातात कामाला
आणि मवळत्या दिनकराला वंदन करीत
चंद्राच्या साथीने चांदण्या मोजत
होतात निद्रेच्या आधीन.

कुणालाही नकळत
अश्या जीवनाचा हेवा वाटुन जातो
कारण...

काम करणार्या हातांमागचा घाणा
आणि निद्रीस्त पापण्यांमागिल
अनिश्चिततेची भीतिदायक स्वप्ने
अद्रुश्य असतात.

-अनिल बिहाणी.

माझं एकटेपण ......


माझं एकटेपण
बरंच काही
माझं एकटेपण
काहीच नाही.

किर्र किर्र रात्रीला
आसवांनी उशी ओली
नादब्रम्ह चैतन्याने
भारलेली सारी खोली.

कोप-यात शांत समई
अंतरातुन साद देत
खोल खोल दुःखाला
ओलसर वाट देत .

भिडभाड गर्दी मध्ये
एकट्याने चालणारं
प्रत्येक चेह-यामागे
स्वतःलाच शोधणारं

तरीही.......

माझं एकटेपण
बरंच काही
माझं एकटेपण
काहीच नाही.



-अनिल बिहाणी
.

क्षण जे उरले काही............


जळुन गेली काया
ओठांवर उरली माया
तो उगा हासतो का?
ही कसली संध्याछाया ?.

ओढुन घेता चादर
जो फुटला नाही पाझर
त्यास प्रेम म्हणावे का?
जो आटुन गेला सागर

ज्या अस्तीत्वच नाही
क्षण जे उरले काही
मी त्यास आठवणी म्हणत
जगणे फुलवीत राही.

-अनिल बिहाणी.

आणि तू ...........


अर्धा ग्लास भरलेला
मी खोल बुडालेलो
आणि तू

मुसळधार पावसात
तू चिम्ब भिजलेली
आणि मी

आठवणीच्या अंधारात
चाचपडत फिरणारा मी
आणि फक्त मी.....

-अनिल बिहाणी

इवलेसे दुःख.....


निळ्या शब्दातून
नीले हे गाणे
निलाईत.

आभालाचे पंख
वार्याचा वेग
ति-हाईत

इवलेसे दुःख
कोरडी आसवे
सुरईत.

-अनिल बिहाणी.

तरीसुद्धा .......


अभालाचं गाणं म्हटलं तरी ,
पृथ्वीला पर्याय नसतो
आणि म्हणुन ,
'जमिनीवर पाय '
याला मुळी अर्थ नसतो .

म्हणुनच
उड़नार्याला उडु द्यावे
पडनार्याला पडू द्यावे
कुणाला सोस कशाला ?
ज्याचे त्याने शोधावे
यात दोष कुणाचा?

तरीसुद्धा
आभालाचं गाणं मात्र म्हणावं
क्षितिजाला स्पर्श करीत ,
आभाळ भरून उरावं .

-अनिल बिहाणी .

येशील रे !


दबक्या पावलाने
दाराशी येत
विचारलं दू:खाने
येऊ का आत?
.
.
.
.
.
त्यावर एक कटाक्ष टाकत
म्हणाली ती
"येशील रे !
इतकी कसली घाई ?
पण माझ्या स्वप्नांना
झोपेतून जागे तर होऊ दे......"
-अनिल बिहाणी .

सांज जराशी ढळली .......


सिद्धार्थाचा होता गौतम
सांज जराशी ढळली
फांदीवरची पानेही
नकळत थोड़ी चळली

पाहूनी हे उन कोवले
गालामध्ये हसले
अंधाराला घेत उशाशी
रात्र हळूच निजली .

-अनिल बिहाणी

संतपण.......


पाहीला एक दुर्जन
पाही दुस-यात दुर्जन
का कसे कोण जाणे
भासला मज सज्जन.

पाहीला एक सज्जन
पाही दुस-यात दुर्जन
का कसे कोण जाणे
भासला मज दुर्जन

दुर्जन सज्जन,सज्जन दुर्जन
एकच कारण
समबुद्धी जाहलीयावीण
न साधे गा संतपण.

-अनिल बिहाणी.

तू आणि पाउस


आभाळ भरून आले
पण पाउस पडलाच नाही
तोही तुझ्यासारखाच लहरी .

तुझे काय रे
तुझ्यावर फक्त मीच अवलंबून
पण पावसावर................?


-अनिल बिहाणी.

......!!!


गावात सोडलेल्या वलुप्रमाणे
स्वैर भटकताना कुठेतरी ती दिसायची
आणि आपसुकच वेग कमी व्हायचा..
आयुष्य त्या इवल्याश्या क्षणाभोवती फिरू लागायचे..
इवल्या इवल्याश्या डोळ्यांनी सैरभैर पाहत
ती गुपचुप हसायची आणि मी
आधीपेक्षा जास्त वेगात सुटायचो...
आताही सारं काही तसंच ....
सारं काही तिथेच ...
पण त्या इवल्याश्या डोळ्यांच्या शोधात
आयुष्य वेशीला टांगलेले
गावाला पीडणा-या वेतालाप्रमाणे ....

-अनिल बिहाणी .

तेव्हा........


डोहामधली पाने
वार्यावर झुलताना
आकाशीचा चंद्र
किंचित हलला ना?

तेव्हा तुझ्या मीठीतुन
हलकेच जाग आली
शुक्राचा तारा
गालात हसला ना?

-अनिल बिहाणी

भारलेले स्तब्ध सारे....

भारलेले स्तब्ध सारे
गोठलेले चन्द्र तारे
निश्चल ही धरा आणिक
थांबलेले ऊधाण वारे

रेंगाळलेले काही पुकारे
साचलेले काही नारे
एक अनामिक करकर करती
उघडी सताड सारी दारे

कधी तरी उठतात पहारे
भानावर येते सारे
एक बदल जाणवतो मात्र
भासतात हे वारे खारे.

-अनिल बिहाणी.

वस्त्रहरण ......


ते निशब्द शांत सारे
हा एकटा आकांत करतो
असहाय, दीन, बापुडा
मदतीची भीक मागतो.

काही पहातात चविने
अन् विक्रूत हासतात
काही समजावीत स्वतःला
खालच्या मानेने निघतात .

गर्दीत बघ्यांच्या त्या
मीही उभा असतो
क्षणभर रेंगाळून तेथे
सावरीत स्वतःला निघतो.

वस्त्रहरण माणुसकीचे
पुन्हा एकदा होते
ते भिष्म द्रोण सारे
पुन्हा षंढ होतात.

-अनिल बिहाणी.

बरस रे मेघा

बरस रे मेघा
बरस रे मेघा

क्षणात बरस
क्षणात तरस
कधी नीरस
पण बरस रे मेघा.

येतील थेम्ब
भिजेल चिम्ब
भरेल कुम्भ
पण बरस रे मेघा.

देतील शिव्या
देतील दुवा
भिजेल दिवा
पण बरस रे मेघा .

भिजेन मी
थिजेन मी
रडेन मी
पण बरस रे मेघा .

-अनिल बिहाणी.

एक अश्रु ..........

एक अश्रु जपला होता
फक्त मी त्यांच्यासाठी
ज्यांचे कधी कुणीच नव्हते
जे नव्हते कुणासाठी

तोही अश्रु हरवून गेला
कधीतरी कुठेतरी
आता कुणी जपते आहे
एक अश्रु माझ्यासाठी.

-अनिल बिहाणी .

असाही पाउस ...

आभाळभर निला रंग मारताना
थकलेल्या काळ्याकुट्ट शरीराने
कपाळीचा घाम
निचोडून टाकला
आणि
.
.
.
.
.पाउस पडला .
-----------------------------
आठवणीच्या काळ्यावाटेवरून
चाचपडत फिरताना
सुरकुतलेल्या डोळ्यातून
दोन अश्रु ओघलले
आणि
.
.
.
पाउस मुसमुसला.
-------------------------------
त्याचे गडगडने पाहून
लखलखणा-या तिने
हलकेच मान वळवली
आणि
.
.
.
.
पाउस हळहळला .
----------------------------------
एका कटाक्षा करीता आसुसलेल्या
अनेक नजरा टाळीत
"त्याची " याचना करीत
तिने हलकेच वर पाहिले
आणि
.
.
.
.
पाउस धन्य झाला .

-अनिल बिहाणी .