Wednesday, June 17, 2009

सांजवेळी

कुणी सांजवेळी
नदीच्या किनारी
शोधीत कुणा
कुणाला पुकारी

कुणी मना-मनांच्या
बांधीत गाठी
प्राशीतो अमृत
लावीत ओठी


कुणी शब्दाना
घेती कवेत
जगण्यास नवे
संदर्भ देत
-अनिल बिहाणी.

Saturday, June 6, 2009

एक अप्रिय कविता

हल्ली मी बोजड कवितांचे ओझे
डोक्यावर घेउन फिरतो
अं~ ह असं मी नाही
लोक म्हणतात
ते असेही म्हणतात
तू गेल्यानंतर हे सारं सुरु झालं
मुर्ख आहेत ते
त्यांना काय माहित
तू असताना मी हे सारं
तुझ्याशी बोलायचो
आणि आता तू नसताना कवितेशी

-अनिल बिहाणी

तटस्थ

उडू द्यावी पडू द्यावी
एक नाव बुडू द्यावी
बुडनार्या नावेमधाली
एक हाक सडू द्यावी

खुलू द्यावी फुलू द्यावी
एक कली उमलू द्यावी
उमललेल्या फुलासवे
एक कळ सलू द्यावी

हिल द्यावी ढील द्यावी
थोडीशी पीळ द्यावी
ढील आणि पीळ मधली
आपण फक्त रीळ व्हावी

-अनिल बिहाणी

मी शोधात सुखाच्या आहे?

दुखास फूटते वाचा
मी एकटा असतो जेव्हा
मग दुःख बोलते फक्त
माझी अडते जीव्हा

दुखास कोणते शब्द
दुखास कोणती भाषा
दुःख जाणते फक्त
गालांवरच्या रेषा

तरीही पुन्हा का मी
भाळतो एकांतास ?
मी शोधात सुखाच्या आहे
हा बहाना केवळ ख़ास

-अनिल बिहाणी।