Thursday, July 31, 2008

हुंदका

कधीकाळी घुसमटलेला हुंदका
आता टाहो फोडतो
कुजबुजतो काहीबाही
ओरडतो काहीवेळ
कधीतरी हळूहळु
होतो आपसुकच शांत
.
.
.
.
कदाचीत त्याला
न्याय मिळन्याची
धूसर आशाही नसावी.

-अनिल बिहाणी

.....तरीही पेटून उठलो.

भडकलो मी अगदी अचानक
रानातल्या वणव्यावानी
घडेल असे कधी काही
नव्हते माझ्या ध्यानीमनी.

नेहमीचा मी खरा की
आजचे हे रूप् खरे?
धुंडाळले अंतर तरीही
प्रश्न अनुत्तरीत सारे

शांत निर्मळ झऱ्याचा या
मार्ग असा का बदलावा
अमावस्येच्या आकाशात
चंद्र अचानक का उगवावा ?

खरेच मजला समजत नाही
का हे असे घडले काही
उजाड उनाड माळरानावर
कशी फूलली ही वनराई ?

अनपेक्षीत सारे घडून गेले
अचानक मी बदललो
स्वाभिमान उरी कधीच नव्हता
तरीही पेटून उठलो.

-अनिल बिहाणी.

अर्घ्य??

मदिरेप्रमाणे चढत जाते रात्र
अन् रातकिडयाची किर्रकिर्र
हळुहळू निवू लगतात गावं
विझवली जातात कंदिलं
अशाचवेळी रंगु लागते मैफ़ल
कोठ्यावर दूर कोठेतरी
कुणीतरी गात असते आर्त स्वरात
जाणवते त्या स्वरात एक मादकता
पण का कोण जाणे तितकीच करूणता
घुंगराच्या नादासोबत विरत जाते रात्र
चढु लागतो उषेचा कैफ़ पुर्व क्षितीजावर
हळुहळू येते शेवटाकडे मैफ़ल
अन् नकळत ओघळतात दोन अश्रु गालावर
हि आसवे त्या संपलेल्या मैफ़लिला
श्रद्धांजली म्हणुन की
कधीकाळी पहीलेल्या अमूर्त स्वप्नांना
अर्घ्य म्हणुन?
काहीही असले तरी
रोजच होत राहतात मैफ़ली
अन् रोजच ओघळतात दोन मूक अश्रु.

-अनिल बिहणी



Wednesday, July 30, 2008

द्वंद्व....

घरातुन पडताना बाहेर
मागे मी ओढला जातो
पप्पा पप्पा करत अलगद
येउन मला बिलगतो.

गोड बोबडे बोल ऐकुनी
नकळत मी गहीवरतो
उंब-यावरती दोन क्षण
अभावितपणे घुटमळतो.

कसेबसे समजावित त्याला
ओठांवरती हसू फूलवीतो
ह्र्दयावरती ठेवून दगड
पोटासाठी बाहेर पडतो.


पोट आणि ह्रदयाचे हे
द्वंद्व असे नेहमी घडते
द्वंद्वात मात्र नेहमीच या
का कसे पण पोटच जिंकते.

-अनिल बिहाणी

दोन कविता.

आयुष्याच्या उजाड भिंतीवर
लिहलेल्या दोन कविता
जाता जाता सहजच
वाचाव्या कुणीतरी
अन् नकळत उमलाव्या
ओठांच्या पाकळ्या दाद देण्यासाठी
नाहीतर मग
चालता चालता मारुन जावं
एक अश्वासक थाप पाठीवर
जमलंच नाही तेही तर
करित कौतुकमिश्रीत स्मितहास्य
जावं पुढे निघुन
अन् आलेच कधी आयुष्यात
उजाड करणारे काही प्रसंग
तर आठवाव्या माझ्या दोन कविता
आणि गुणगुणत सहजच त्या
लिहाव्या आपणही आपल्या आयुश्याच्या
उजाड भिंतीवर दोन कविता
मागुन येणा-यांसाठी .

-अनिल बिहाणी.




वांझ.........

वांझपणाची घ्रुणा असलेल्य़ा
या समाजमनावर मात्र
नेहमीच उठते
वांझ शब्दांची
वांझ संतापाची
वांझ अश्वासनांची
एक् लाट
अन् विरतेही कुटल्या कुठे
पण कोडगेपणाची रेती
कणभरही सरकत नही

-अनिल बिहाणी.

आईसारखे......

एका हाताने पुसत डोळे
दुस-या हाताने घालत गुद्दा
शिकवायचं चालायला वाटेवर.

कधीमधी रेंगाळला जर रस्त्यामध्ये
एक दोन देत धपाटे
आणित पुन्हा भानावर

आईसारखे लपवीत पाणी डोळ्यामधले
मायेने फिरवावा हात
'आयुष्याच्या' पाठीवर.

~अनिल बिहाणी.

सावट ........

क्षणाक्षणाला शोधत असते
कणाकणाने जळत असते
इथल्या असल्या जगण्यावरती
मरणाचे सावट असते.

हसणार्या दारावरती
तिरडीची सावली घुमते
चमकणार्‍या डोळ्यांमागे
आसवांचे दालन जगते

कुणी भडभडून जळताना
कुणा जगण्याचे कारण मिळते
इथल्या असल्या जगण्यावरती
मरणाचे सावट असते.

~~अनिल बिहाणी .

Sunday, July 13, 2008

देन...

झिंगलेल्या रातीकडुन
झिंगलेपणाचं देन घेउन
पहडुन रहावं शांतपणानं

घेउ नये मुळी अंधारचा ठाव
अन् करुही नये प्रकाशची हाव

अनुभवत कैफ़्
असुनही नसण्यातला
विसरुन जावं देहभान
पुसत अस्तित्वाच्या खुणा.
-Anil M. Bihani.

अर्थ.

असण्या अन् नसण्यामध्ये
होती कुठेतरी खोलवर
असूनही नसण्याची एक दरी

जिथे होतो मी उभा
तू निघुन गेल्यानंतर
कानात प्राण साठवुन.

पण शेवटपर्यंत आलीच नाही
ती अश्वासक हाक
ज्यामुळे होता अर्थ माझ्या असण्याला.

-Anil Bihani.