Saturday, August 23, 2008

पान

एक पान वाहताना
दगडाला अडलेलं
जगण्यावरती उगाचच
थोडसं रुसलेलं

कधीतरी खूप आधी
झाडाला पाहुन हसलेलं
आठवुन जुनं सारं
नकळत थरथरलेलं .

-अनिल बिहाणी

Thursday, August 14, 2008

शुक्राची चांदणी.

मठात लपून बसलेल्या साधुच्या
चेह-यावर पसरलेल्या चांदण्यात
चंद्र शोधताना
शिशिरातील पानगळीत सापडलेलेले
हिरवे पान तपासत राहीले
तेच जगण्याचे जुने संदर्भ .
डोक्यावर आभाळ ओढून घेण्याचा
केविलवाणा प्रयत्न करणारे
उघडेबोडके दुर्लक्षित खेडे
या सा-यांमध्ये
भिजत पडलेल्या दुःखाची
परिसीमा शोधताना
आयुष्याच्या सीमा दूर गेल्या होत्या
अगदी दूर क्षितीजाच्या पार
अन् दिसत राहीली तीच
धूसर रेषा आणि त्यावर
चमकणारी दिमाखदार
शुक्राची चांदणी.

-अनिल बिहाणी

आई .

शांत शांत मनावर
दाटता वादळ
हेलकावते मन
उठतो कल्लोळ.

नभी चांदव्याची रात
लावीते हुरहुर
ओघळे आठवांच्या सरी
माजते काहुर .

क्षितीजावर दिसे मग
तिचाच चेहरा
दाखवित दिशा
हासे नकळत जरा .

-अनिल .

Monday, August 11, 2008

क्षितीजाच्या रेषेवरती ........

क्षितीजाच्या रेषेवरती
मन उगाच फिरते
आर्त उदास विराणी
ओठांवर का येते .

कातर कातर क्रुष्णछाया
निळी सावळी गहराइ
कातळ काळे ओले कोरडे
आतल्या आत झिरपत जाई.

ओघळण-या रात्रीला
पुसण्याचा प्रयत्न करित
झोपेच्या आधीन होतो
अंधाराला मिठी मारत.

-अनिल बिहाणी